Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पुणे

पालखी मार्गावरील ७० अनधिकृत होर्डिंग्जवर’पीएमआरडीए’चा हातोडा!

पालखी मार्गावरील ७० अनधिकृत होर्डिंग्जवर’पीएमआरडीए’चा हातोडा!

अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जुलै महिन्यातील आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील पालखी मार्ग आता अनधिकृत होर्डिंग्जपासून पूर्णपणे मुक्त करण्यात येत असून, आतापर्यंत ७० अनधिकृत होर्डिंग्जवर अनधिकृत बांधकाम विभागाने हातोडा चालवून ती भुईसपाट केली आहेत.

viara vcc
viara vcc

पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, आणि वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मे महिन्यातच या मार्गांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाने ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गांवरील सुमारे १२३ होर्डिंग्जचे सविस्तर सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिली. यामध्ये हवेली-सोलापूर रस्त्यावरील ३२, दौंड तालुक्यातील १३, पुरंदर तालुक्यातील १३ आणि वडकी येथील १२ अशा एकूण ७० अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाने थेट हातोडा चालवून ती भुईसपाट केली आहेत. तसेच, काही अनधिकृत होर्डिंगधारकांनी आपली होर्डिंग्ज स्वतःहून काढून घेतली आहेत.

केवळ मुख्य पालखी मार्गच नव्हे, तर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरील आणि मोक्याच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचेही सर्वेक्षण सध्या वेगाने सुरू आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत अथवा विनापरवाना उभारलेली होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी स्पष्ट केले.

“‘पीएमआरडीए’च्या हद्दीत कुठेही होर्डिंग्ज उभारताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमबाह्य आणि विनापरवाना उभारलेल्या होर्डिंग्जवर कोणतीही गय न करता थेट निष्कासनाची कारवाई केली जाईल.” —डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"