पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी समस्यांवर चर्चा!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची त्यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवड झाल्याबद्दल तसेच उद्योगमंत्री म्हणून फेरनियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार, स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, आणि स्वीकृत संचालक संजय भोसले उपस्थित होते.
CETP प्लांटसंदर्भात
भोसरी औद्योगिक परिसरातील CETP प्लांट जागेअभावी बंद आहे. MIDC ने चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
अग्निशमन केंद्र
पिंपरीतील एफ-२ ब्लॉकमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
घातक कचऱ्याची समस्या
औद्योगिक घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीची सोय महानगरपालिकेने करावी, अशी मागणी आहे. सध्या कचऱ्याचे संकलन खासगी यंत्रणेद्वारे होत असून खर्च लघुउद्योजकांना परवडत नाही.
चाकण औद्योगिक परिसरातील अडचणी:
MIDC ने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनींच्या मोबदल्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे लघुउद्योजकांना प्लॉटवर बांधकाम करताना अडथळे येत आहेत.
उद्योगमंत्र्यांची तातडीची कारवाई
मंत्री सामंत यांनी तात्काळ महानगर आयुक्तांना CETP प्लांट, अग्निशमन केंद्र, आणि घातक कचरा प्रकल्पांचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. चाकण परिसरातील समस्यांवर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
उद्योगमंत्र्यांनी लघुउद्योजकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लवकरच खास बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.