पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय;तीन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयीन तीन पोलीस अंमलदार कर्मचाऱ्याची सेवानिवृत्त निमित्ताने पोलीस आयुक्तालय येथील शिवनेरी हॉल या ठिकाणी सत्कार व निरोप समारंभ करण्यात आला.
वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलिस अंमलदार अशोक विनायक पवार पोलीस उपनिरीक्षक, भोसरी एमआयडीसी, राजू तानाजी चौधरी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, शिवाजी बापूराव गोरे पोलीस शिपाई, पोलीस मुख्यालय हे तीन अंमलदार आज 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचे कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
या निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त मुख्यालय गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड (कल्याण शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयुक्तालयातील कर्मचारी वृंद व सेवानिवृत्त झालेले पोलिस अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.

पुमा कंपनीचे लोगो बनावट उत्पादनावर लावून विक्री!
पिंपरी : पुमा कंपनीचे लोगो बनावट उत्पादनावर लावून विक्री करीत असताना सुमारे 86 हजार 184 रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार 30 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लेजंड चॉईस, चिराग फर्निचरच्या शेजारी, शनी मंदिराचे जवळ, साई चौक, पिंपरी येथे करण्यात आली.
या प्रकरणी नीरज कुमार नरेंद्रकुमार दहिया (वय 38, रा. फ्लॅट नंबर 30, द्वारकाशीची सदरपुर रोड, गोविंदपुरम सिटी पार्क जवळ, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इस्माईल इस्तीखर खान (वय 31,रा. फ्लॅट नंबर 502, ए विंग ऍक्रोपॉलिक्स बिल्डिंग, विजयानगर काळेवाडी, मूळ पत्ता- रूम नंबर 644, नाईक नगर झोपडपट्टी विभाग, लालबहादूर शास्त्री सायन मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पुमा या कंपनीचे लोगो असलेले 86,184 किंमतीचे टी-शर्ट, हाफ पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट हे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ग्राहकांची व कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पुमा कंपनीचा बनावट लोगो उत्पादनावर लावून विक्री करत असताना मिळून आले .पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वारे हे तपास करत आहेत.

