पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा!

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण
पिंपरी : भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपस्थितांना आयुक्त शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.
आयुक्त सिंह म्हणाले,’भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा उत्सव आपण घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून आनंदाने साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या देशाच्या इतिहासाची सुवर्ण पाने आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.’

‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ई-प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांमुळे आपले शहर देशभरात वेगळा ठसा उमटवत आहे. आगामी काळात देशाच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे मोठे योगदान असेल, असा मला दृढ विश्वास आहे,’ असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, ,माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे,नामदेव ढाके, जितेंद्र ननावरे,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर,शहर अभियंता मकरंद निकम,मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे, डाॅ.अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड,देवन्ना गट्टूवार,अनिल भालसाखळे,उप आयुक्त राजेश आगळे,अण्णा बोदडे, पंकज पाटील, प्रदीप ठेंगल,ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध शौर्यपदक विजेते मनपा अधिकारी,कर्मचारी यांचाही गौरव
आजच्या कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरपत्नी,वीरनारींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यामध्ये दिवंगत स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण मेहेंदळे यांच्या वीरपत्नी सुलोचना मेहेंदळे,दिवंगत दिगंबर ढवळे यांच्या वीरपत्नी भिमाबाई ढवळे,दिवंगत बाळकृष्ण पुराणिक यांचा मुलगा प्रफुल्ल पुराणिक यांचा समावेश होता.
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशसेवा करणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील आजी-माजी सैनिकांना देश सेवेबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यामध्ये नायक सुभेदार मनोजकुमार साहू, नायक सुबेदार झेंडे रायबा आणि नायक अमितकुमार सिंह, सुबेदार मेजर संदीप बहिवाल, ऑननरी कॅप्टन प्रमोद निकम, मेजर उदय जरांडे यांचा समावेश होता.
ऑपरेशन स्नो लेपर्ड (लेह-लडाख) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल कमेंडेशन कार्ड पदक प्राप्त नायब सुबेदार मनोजकुमार साहू, नायब सुभेदार झेंडे रायबा आणि नायब अमितकुमार सिंह यांना सन्मानित करण्यात आले.
तर सुभेदार मेजर संदीप बहिवाल यांना ऑपरेशन कारगिल मध्ये कमेंडेशन कार्ड मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ऑननरी कॅप्टन प्रमोद निकम यांनी ऑपरेशन कारगिल मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल कमेंडेशन कार्ड प्राप्त केले तर मेजर उदय जरांडे यांनी बार टू सेना मेडल (शौर्य पदक) २००५, सेना मेडल (शौर्य पदक) २००६, मेंशन इन डिस्पॅचेस (शौर्य पदक) २००५ आणि कमेंडेशन कार्ड २००६ असे अनेक सन्मान मिळवले आहेत. त्यांनी ऑपरेशन ऑर्किड (मणिपूर) मध्ये उल्लेखनीय सेवा बजावली. या सर्व शूरवीरांचा पिंपरी चिंचवड स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.