पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, शहरातील दिव्यांची दुरुस्ती व देखभाल, दफनभूमी सुरक्षा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या प्रकल्पांसाठी टाकणे, मनपा हद्दितील मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिलांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना मनपाच्या कर संकलन विभागाच्या मंजूर दराने मानधन देण्याबाबतच्या उपसूचनेला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते.

या सोबतच “मुख्यमंञी – माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलामार्फत भरून घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेस माहे जूलै २०२४ ते सप्टेंबर -२०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अदायगी करणे बाबतच्या उपसुचनेस आज महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये, पाणी पुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुल पासून जाधववाडी पंप हाऊस पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, काळेवाडी परिसरातील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती च्या कामांना मंजुरी, प्रभाग क्र. १७ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. १६ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरस्ती करणे, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती व अनुषांघिक कामे करणे, मोशी येथे दफन भूमी विकसित करून अंतर्गत विद्युत विषयक कामे करणे, यमुनानगर रुग्णालयात जनित्र संच बसविणे, निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे जनित्र संच उभारणे, प्रभाग क्र. १ व १२ मधील विविध चौक व कमानीचे सुशोभीकरण व अनुषांघिक कामे करणे, भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा, कार्यालये, दवाखाने याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता कामांना मंजुरी देणे, जीवन नगर ताथवडे येथील पंप हाऊस चा वीज भार उपलब्ध होण्यासाठी म.रा.वि.वि कंपनीस रक्कम अदा करणे, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मी.मी.व्यासाची रायझिंग मेन टाकणे व बी.पी.टी. ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मी.मी. व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकणेकामी अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करणे, सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रा जवळील म.रा.वि.वि कं. ची २२ के व्ही उपस्कर वाहिनी हटविणे, प्रभाग क्र, ११ व १३ मधील जुने गंजलेले व धोकादायक पोल बदलणे व अनुषांगिक कामे करणे, लिंकरोड चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमी, दापोडी, निगडी, दिघी मुस्लिम दफनभूमी, दिघी लिंगायत दफन भूमी येथील काळजीवाहक संस्थाना मुदतवाढ देणे,
शहरातील मालमत्ता धारकांना बिले अदा करण्यासाठी नेमलेल्या महिला बचत गटांना १०% रक्कम अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रजा मंजूरी खर्चास देखील आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या उपसूचनेस बैठकीत मान्यता देण्यात आली.

