पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ; स्थायी समितीला सादर!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2026 -27 या वर्षाकरिता एकूण 5660 कोटी व केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनेसह 9322 .17 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज शनिवारी (28 फेब्रुवारी) रोजी स्थायी समितीला सादर केले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणत्याही महत्वाच्या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली नाही. शिवाय कोणतीही करवाढ सुचविली नाही.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची आज अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर लगेचच घाईगडबडीत आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर सादर केले. या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक आणि 2026- 27 या वर्षाचे महसूल असे मिळून 5660 रुपये जमाखर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष प्रकल्पांसाठी मिळणारे अनुदान समाविष्ट करून एकूण अंदाजपत्रक 9 322 .17 कोटीचे सादर करण्यात आले.
जमा रकमेमध्ये मालमत्ता कर 1100 कोटी, वस्तू व सेवा कर 2788 कोटी ,मुदत ठेव व व्याज 160 कोटी, बांधकाम परवानगी 750 कोटी आणि इतर विभाग जमा 535 कोटी असे एकूण 5,6 60 कोटी रुपये जमा दाखवण्यात आले आहेत.
खर्चामध्ये स्थापत्य विभागासाठी 727 कोटी 92 लाख, भूसंपादन 100 कोटी, विद्युत विभागासाठी 32.78 कोटी, पाणीपुरवठ्यासाठी 155. 73 कोटी, पर्यावरण विभागासाठी 24.35 कोटी, कल्याण निसारण विभागासाठी फक्त 18.26 कोटी, ‘प’ अंदाजपत्रकासाठी 34.10 कोटी असा भांडवली खर्च दाखविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने हरितकर्ज 200 कोटी घेतले असून 24.50 कोटी मुद्दल , 9.42 कोटी व्याज यावर दिले असून 175.50 कोटी कर्ज शिल्लक आहे. मनपा कर्जरोखे 200 कोटी -मुद्दल 100 कोटी, व्याज 40.79 कोटी असे शंभर कोटी कर्ज शिल्लक आहे. जागतिक बँकेकडून 159.11 कोटी कर्ज घेतले असून त्यापैकी 97.72 कोटी मुद्दल आणि 45.60 कोटी व्याज जमा केले असून 61.39 कोटी कर्ज बाकी आहे .एकूण 559.11 कोटी कर्ज घेतले असून 222. 22 कोटी मुद्दल व व्याजापोटी 95. 81 कोटी भरले आहेत. 336.89 कोटी कर्ज बाकी आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण निधी 1455 कोटी व इतर राखीव निधी 4235 कोटी अशा एकूण पाच हजार सहाशे नव्वद कोटी मुदत ठेवी शिल्लक आहेत.
क्षेत्रीय कार्यालयासाठी विशेष तरतुद
पिंपरी चिंचवड महापालिका विकास कामांसाठी 1186 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 436.94 कोटी स्थापत्य विभाग, 50 कोटी महापौर निधी, 19.53 कोटी महिलांच्या विविध योजनांसाठी, 99 कोटी, दिव्यांग कल्याणकारी योजना, 68.30 कोटी, पाणीपुरवठा कामांकरिता 155.73 कोटी, पीएमपीएल करिता 400 कोटी ,भूसंपादन 100 कोटी ,अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता दहा कोटी, स्मार्ट सिटी साठी 50 कोटी, अमृत दोन योजनेसाठी 54.45 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय 6.29 कोटी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय 11.49 कोटी, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय 10.25 कोटी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय 11.44 कोटी, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय 3.70 कोटी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय 9.30 कोटी, ‘ग’ शेत्रिय कार्यालय 5.28 कोटी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय 7.92 कोटी विकास कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी 52.55 कोटी, क्रीडा निधी 61.23 कोटी, महिलांसाठी 99.94 कोटी, दिव्यांगांसाठी 68.30 कोटी, भूसंपादन 100 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी स्थायी समितीला दाखल केलेल्या 2026 27 च्या अंदाजपत्रकात कोणत्याही विशेष प्रकल्पासाठी तरतूद न करता 2025 -26 या अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या अपूर्ण विकास प्रकल्पासाठीच तरतूद केली आहे. महापालिका अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून नागरिकांच्या सूचना अर्थसंकल्पासाठी मागवल्या होत्या. यामध्ये 4996 एकूण सूचना प्राप्त झाल्या .त्यापैकी फक्त 297 सूचनांचा महापालिकेने विचार केलेला आहे.

