पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी राबवणार व्यापक मोहीम!

योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींना सेवा अधिक सक्षमपणे देण्यासाठी ठरणार उपयुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग नागरिकांची अचूक नोंद घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींची नेमकी संख्या, त्यांच्या अडचणी, गरजा आणि लाभार्थी योजना यांचा आढावा घेऊन अधिक प्रभावी नियोजन आणि सेवा देणे यासाठी हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे.
दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने स्थानिक स्तरावर दर ५ वर्षांनी दिव्यांगांचा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. परंतु सद्य परिस्थितीमध्ये २०१६ च्या कायद्यानुसार २१ प्रकारचे दिव्यांगत्व निदर्शनास आणलेले आहेत.

गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेले ‘दिव्यांग भवन’ हे महाराष्ट्रातील पहिलेवहिले असे केंद्र आहे, जे दिव्यांगांसाठी पुनर्वसन, थेरपी, सहाय्यक सेवा, कौशल्यविकास आणि सक्षमीकरणासाठी एकाच छताखाली सेवा देत आहे. हे नवीन सर्वेक्षण ‘दिव्यांग भवन’साठी नियोजन व सेवा पुरवठा अधिक प्रभावी बनवण्यासाठी आधारभूत ठरणार आहे. , त्यांनी हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून अचूक माहिती संकलनाचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्वेक्षणादरम्यान दिव्यांग व्यक्तींनी सहकार्य करावे, योग्य माहिती द्यावी आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाने केले आहे.
नवजात अर्भक आणि अर्भकांमध्ये दिव्यांगत्व आढळल्यास पालकांना उपचारांसाठी संदर्भित माहिती प्रदान करणे, बेरोजगार किंवा कुशल दिव्यांग तरुण/ स्त्रिया / महिला/ पुरुष यांना रोजगार किंवा स्व-रोजगारसाठी मार्गदर्शन करणे तसेच त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी अनुकूल उपाययोजनांची आखणी करणे दिव्यांग वृद्धांच्या समस्या समजून घेणे, त्यांची सध्य परिस्थिती पाहणे आणि त्यांना कोणत्या विशेष मदतीची आवश्यकता आहे हे जाणून घेणे व त्या अनुषंगाने त्याच्या मदतीसाठीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करणे.
ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने केले जाणार सर्वेक्षण :- दिव्यांग व्यक्तींचा सर्वेक्षण करण्यासाठी महिला बचत गट, आशा सेविका आणि दिव्यांग बांधवांची मदत घेण्यात येणार आहे. हा सर्वेक्षण ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन माहिती संकलित करण्यासाठी ॲप देखील तयार करण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी प्रभावी योजना राबवण्यासाठी आधी त्यांची अचूक माहिती संकलित असणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर आधारित शहरातील दिव्यांगांसाठी सुविधा आणि योजना अधिक सक्षम करता येणार आहेत. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

