हवामान बदलांचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिका आंतरराष्ट्रीय करारात सहभागी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता ग्लोबल कोव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी (GCoM) या आंतरराष्ट्रीय करारात सहभागी झाली आहे. हवामान बदलांशी लढण्यासाठी जगभरातील शहरांनी एकत्र येऊन हा करार केला असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील सहभाग घेतला आहे. यामध्ये १४४ देशांतील १३,७०० हून अधिक शहरे सहभागी आहेत.
या करारात सहभागी होऊन महानगरपालिकेने शहरातील हरितगृह वायू (Greenhouse Gases) कमी करणे, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचे प्रमाण वाढविणे, हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आराखडा तयार करणे आणि याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊले उचलणे ही उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविले आहे. GCoM करारात सहभागी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देश- विदेशातील इतर शहरांशी अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करता येणार आहे. यामुळे शहराला हवामान बदलासंदर्भात तांत्रिक मदत, प्रशिक्षण, उपयुक्त माहिती तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरलेले उपाय वापरण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, ही भागीदारी शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाची असून पर्यावरणाचे रक्षण, ऊर्जा वापरात सुधारणा आणि नागरीकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.

“पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी पर्यावरण रक्षण ही केवळ गरज नाही, तर आपली जबाबदारी आहे. GCoM करारात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला जागतिक अनुभव,तांत्रिक मदत आणि प्रभावी उपायांचा लाभ होणार आहे, जो शाश्वततेकडे वाटचाल करताना अत्यंत उपयुक्त ठरेल. २०३२ पर्यंत पिंपरी चिंचवडला एक स्वच्छ, हरित शहर बनवण्याच्या ध्येयात हे पाऊल निर्णायक ठरेल. -शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका