फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यास सज्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यास सज्ज

महिलांच्या व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
पिंपरी : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि. १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी राज्‍यभर होणार असून राज्‍यस्‍तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्‍हाण सेंटर, रंगस्‍वर सभागृह नरिमन पॉईंट येथे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री, मा. राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्‍यात आला आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यात विविध आरोग्य शिबिरे, तपासण्या आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, नागरिकांना या सर्व सेवांचा व्यापक लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने विशेष नियोजन केले आहे. सदर अभियानाचा शुभारंभ महानगरपालिके मार्फत सन्माननीय लोक सभा सदस्य , विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य तसेच आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते तालेरा रुग्णालय, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय व कै. ह.भ.प. मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सदरची शिबिरे महानगरपालिकेच्या आठही रुग्णालयात तसेच ३१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे दैनंदिन (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत) आयोजित करण्यात आलेली आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सर्व महिलांना आवाहन करण्यात येते कि, सदर शिबिरातील विविध सेवांचा लाभ घ्यावा.

महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या सदर अभियानाची वैशिष्ठ्ये
• उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया तपासणी.
• गर्भवती महिलांची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण समुपदेशन, लसीकरण.
• किशोरींसाठी मासिक पाळी व पोषणावरील सत्रे, समुपदेशन.
• १ ऑक्टोबर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त रक्त संकलनाचे लक्ष्य.
• आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान वय वंदना कार्ड वितरण.
• निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी व क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन.
• आवश्यक रुग्णांना विशेषज्ञांकडून पुढील तपासण्या (रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्स-रे, शस्त्रक्रिया) केल्या जातील.

“महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या आरोग्याचे संरक्षण केल्यासारखे आहे. या अभियानाद्वारे तज्ज्ञ सेवा आणि व्यापक जनजागृती करून समाजातील महिला व बालकांना निरोगी करण्याचे शासनाचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.”— शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"