पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २३ आदर्श शिक्षकांचा गौरव!

बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा पैलू आहे. महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शाळा अतिशय उत्तम कार्य करीत आहेत. मी देखील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असून माझ्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शाळा म्हणजे मुलांच्या भविष्यासाठीचा भक्कम पाया आहे. त्या पायाला मजबूत करण्याचं कार्य आपले शिक्षक निष्ठा, समर्पण आणि प्रेमाने करीत आहेत. पर्यवेक्षक आणि शिक्षक यांचा एकत्रित प्रयत्न हीच आपल्या महापालिका शाळांची खरी ताकद आहे. शिक्षकांच्या या योगदानामुळे महापालिका अधिक गुणवत्तापूर्ण, सक्षम आणि आदर्शवत शाळा उभारण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे.
सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वाचे कार्यही करतात. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आपल्या महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. शिक्षण विभाग सातत्याने गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रवासात शिक्षकांचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले. सूत्रसंचालन चारोशीला फुगे यांनी केले, तर आभार गणेश लिंगडे यांनी मानले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा यावेळी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले शिक्षक
शिक्षक दिनानिमित्त विशेष कामगिरीबद्दल महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये क्रीडा शिक्षक भाऊसाहेब व्यंकट खैरे, पीसीएमसी पब्लिक स्कूल जाधववाडी कन्या प्राथमिकचे जितेंद्र कराड आणि आबासाहेब पाळवंदे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
थेरगाव येथील बालवाडी विभागातील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेच्या सविता मांडेकर, यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा थेरगावच्या नसरीन बानो मोहम्मद सुलतान आणि सावित्रीबाई फुले शाळा मोशीच्या वैशाली साकोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.
प्राथमिक शाळांमधून मोशी मुले येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या प्रियंका गावडे, सुभांगी भोंडवे, दिघी कन्या पब्लिक स्कूलचे प्रदीप घुटे, भोसरी कन्या पब्लिक स्कूलच्या स्वाती शिंदे, मोशी कन्या पब्लिक स्कूलच्या कांचन घोडे, चिखली कन्या पब्लिक स्कूलच्या विश्वलता मोरे, कुदळवाडी पब्लिक स्कूलचे मारुती खामकर, पिंपळे गुरव पब्लिक स्कूलच्या चित्रा शेवकरी आणि थेरगाव उर्दू पब्लिक स्कूलच्या उस्ताद बिबिहाज्रा जंगबहादूर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.