फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कचरा व्यवस्थापन करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन!

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कचरा व्यवस्थापन करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन!

 घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा पुढाकार
 पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करून वसुंधरापूरक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने जनजागृती मोहीम राबवत आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांमधून दररोज १०० किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण होतो, अशा सोसायट्यांना महापालिकेकडून स्वतःहून कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असून जास्तीतजास्त सोसायट्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेकडून शहरातील कचऱ्याचे वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 यामध्ये ओला सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, शून्य कचरा प्रकल्प, तसेच वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आर.आर.आर. केंद्रे या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच महापालिकेकडून अशा पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, आस्थापने, हॉटेल व्यवसायिक आणि इतर मालमत्ता धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता कर भरताना सामान्य करात सवलती देण्यात येत आहेत.

महापालिकेच्या या प्रोत्साहनपर उपक्रमामुळे शहरातील अनेक सोसायट्या, शाळा, आस्थापने आणि उद्योगसंस्था कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने पुढाकार घेत आहेत. यामुळे शहरातील कचरा संकलनावरील ताण कमी होऊन वसुंधरापूरक आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

  पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सवलती
 ऑन-साईट कम्पोस्टिंग युनिट कार्यान्वित असल्यास : ५ टक्के सामान्य करात सूट
 ऑन-साईट कम्पोस्टिंग युनिट आणि एसटीपी प्लांट दोन्ही कार्यान्वित असल्यास : ८ टक्के सामान्य करात सूट
 फक्त एसटीपी प्लांट कार्यान्वित असल्यास : ३ टक्के सामान्य करात सूट
 शून्य कचरा संकल्पना राबविल्यास : ८ टक्के सामान्य करात सूट
 शून्य कचरा प्रकल्प आणि एसटीपी दोन्ही कार्यान्वित असल्यास : १० टक्के सामान्य करात सूट

पिंपरी चिंचवड महापालिका ही वसुंधरास्नेही शहर घडविण्याच्या दिशेने शाश्वत पावले उचलत असून, कचरा व्यवस्थापनात नागरिक आणि सोसायट्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःच्या परिसरात कचऱ्याचे कम्पोस्टिंग करणाऱ्या संस्था खरं तर शहराच्या स्वच्छतेच्या खऱ्या भागीदार आहेत. महापालिकेकडून अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य दिले जात आहे. — डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"