डिझेल आणि पेट्रोल दरात तीन रुपयांची वाढ; महागाईचा भडका

पिंपरी : अमेरिका आणि इराण मधील वाढता तणाव आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडताना दिसत आहे .जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या असून भारतातही आज शुक्रवार (15 मे) रोजी डिझेल आणि पेट्रोल दरात अनुक्रमे तीन रुपये आणि 3.11रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजी दरातही दोन रुपयांनी वाढ केल्याने आता महागाईचा भडका आणखी वाढण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे तेल कंपन्यांना दररोज सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तेल कंपन्या पेट्रोलवर 26 रुपये आणि डिझेलवर तब्बल 82 रुपये प्रति लिटरचा भार उचलत असल्याचे समजते .
याशिवाय केंद्र सरकारने यापूर्वीच पेट्रोल वरील आठ रुपये आणि डिझेलवरील सहा रुपये उत्पादन शुल्क कमी केले आहे. पेट्रोल आणि डिझेल वाढीचे संकट हे बाह्यपरिस्थितीमुळे उद्भवले असून भारत कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मधील चढ उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मध्यपूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे .त्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किंमतीमध्ये दिसून येत आहे.
आजचे महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
मुंबई -106.54 93.14
दिल्ली -97.77 90.78
चेन्नई -103.84 95.50
कोलकत्ता– 108.41 95.13
पुणे -107.84 94.45
बंगळुरू– 102.96 94.10
पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे प्रत्येक महिन्याचे बजेट यामुळे कोलमडणार आहे. देशात महागाईचा दबाव आता वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2026 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर वाढवून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88% इतका होता. अवघ्या महिन्याभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षाचा विक्रम मोडणारी ठरली आहे.

