पे ऍन्ड पार्क आणि व्हॉट्सऍप पार्किंग सुविधेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या ‘पे अॅण्ड पार्क’ उपक्रमांतर्गत नागरिकांना आता अधिक सुलभ पद्धतीने पार्किंग बुक करता येणार आहे. यासाठी खास ‘व्हॉट्सऍप पार्किंग’ ही डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्याने विकसित करण्यात आलेल्या सेवेचे उद्घाटन स्थायी समिती बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

या सुविधेचा वापर करून नागरिक थेट व्हॉट्सऍपवरून वाहन पार्किंग बुक करू शकतात. हे बुकिंग वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवले जाते. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते, आणि ती जागा पुढील नागरिकासाठी खुली केली जाते. शहरातील १० ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे आणि वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे.
या सेवेमुळे कागदपत्रे किंवा तिकिटाची गरज पडणार नसून प्रत्यक्ष (रिअलटाईम) माहिती आणि आरक्षण स्थिती (बुकिंग स्टेटस) व्हॉट्सऍपवरच मिळणार आहे. शिवाय स्मार्ट अलर्ट्सद्वारे वेळेचे व्यवस्थापन देखील होणार आहे. महापालिकेच्या या डिजिटल पुढाकारामुळे पार्किंग प्रक्रियेत सुसूत्रता आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे, तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार असल्याची माहिती शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी दिली.