सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग : हर्षवर्धन पाटील

पुणे : माजी मंत्री व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर तुतारी फुंकली आहे. त्यांनी आज इंदापुरातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश केला. इंदापूर येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी तुतारी हाती घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला.
इंदापूर येथे आज हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी जयंत पाटलांचे आभार मानले.
ते म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की, त्या चारवेळा खासदार झाल्या आहेत. यात आमचा तीन वेळा प्रत्यक्षपणे सहभाग होता. पण कालच्या लोकसभा निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट करताच उपस्थितांनी हासून दाद दिली.
हर्षवर्धन पाटील पुढे असे ही म्हणाले, आपण कधीच व्यक्तिगत निर्णय घेत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. तुम्ही हातात तुतारी घ्या असा आग्रह शरद पवार यांचा होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला. शरद पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. काही पदरात पाडून घेण्यासाठी नाही, १० वर्षात कुठल्याच संवैधावनिक पदावर नव्हतो. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. दिलेली जबाबदारी पार पडणार आहे. लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे, मी जनतेचे ऐकले, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
लोकशाहीत जनता श्रेष्ठ आहे, त्यामुळे जनतेने दिलेला आवाज मी ऐकला. २०१९ ला जनतेचा विचारानेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णयाची कल्पना दिली आहे. जनतेचा निर्णय मला स्वीकारावा लागेल, ही कल्पना देऊनच मी हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.