शो-मॅनचे सिनेमे पुन्हा झळकणार!

राज कपूर यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त रणबीर कपूरची इफ्फीमध्ये घोषणा
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पणजी : केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या सिनेमांचा चाहता वर्ग निर्माण करणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त भारतात पुन्हा त्यांचे सिनेमे झळकलेले बघायला मिळणार आहेत.
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनाची घोषणा केली आहे. गोवा येथे सुरू असलेल्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) निर्माते राहुल रवैल यांनी रणबीर याच्याशी संवाद साधला, तेव्हा तो बोलत होता. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जन्म दिवस असतो. त्यानिमित्ताने १३ ते १५ डिसेंबर या काळात संपूर्ण देशभरात राज कपूर यांच्या सिनेमांचा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NFDC), नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NFAI), आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन (FHF) आणि रणबीर याचे काका कुणाल कपूर यांनी राज कपूर यांच्या १० चित्रपटांना पुनर्संचयित करण्यास सुरुवात केली आहे.