भोसरीत खेळ रंगला मंगळागौरीचा!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : श्रावणमासानिमित्त भोसरीत महिलांसाठी मंगळागौरीचे खेळ आयोजित करण्यात आले. महिलांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवाजली संखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने मतदार संघातील महिलांसाठी श्रावणसरी अन् मंगळागौरी हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, १२ जोतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भिमाशंकर दर्शन यात्रा उपक्रमाचे आयोजित करण्यात आले.
श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर दर्शन यात्रा उपक्रमाला भोसरी विधानसभा मतदार संघातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध गावांमधून २४ हजार ३०० हून अधिक महिला भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्रावणमासामध्ये मोठ्या भक्ती-भावाने ही यात्रा निर्विघ्न पूर्ण झाली. तसेच, श्रावणातील ५ सोमवारी मंदिराजवळ अन्नदान करण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व सोमवारी आमदार महेश लांडगे यांनी श्रींचा अभिषेक व पहाटेची आरती केली. तसेच, भोसरी मतदार संघातील सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांना ऋद्राक्ष वाटपही करण्यात आले. या धार्मिक व अध्यात्मिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
शिवांजली सखी मंचच्या पूजा लांडगे म्हणाल्या की, मतदार संघातील महानगरपालिकेच्या एकूण १२ प्रभागांमध्ये प्रत्येक गावनिहाय श्रावणसरी अन् मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकूण ३४ ठिकाणी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सुमारे १ लाखाहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात माता-भगिनींना विरंगुळ्याचे काही क्षण मिळावेत, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा. आपली संस्कृती… आपला अभिमान… या संकल्पनेतून सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना भेटवस्तूही देण्यात आली.
देव…देश अन् धर्म याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. भारतीय संस्कृती आणि शिव- शक्तीची आराधना करण्याचे पुण्य श्रावणात मिळाले. मंगळागौरी व श्री क्षेत्र भिमाशंकर दर्शन यात्रा उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक माता-भगिनींचे आभार व्यक्त करतो. या उपक्रमांसाठी सर्व सहकारी, मित्र परिवार आणि देवस्थान ट्रस्टने सर्वोतोपरी सहकार्य केले त्यांना धन्यवाद देतो, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.