दशमी सोहळ्यासाठी भंडारा डोंगरावर चोख नियोजन

चार चाकी व दूचाकी वाहनांना बंदी, भाविकांच्या सोयीसाठी १५ बसची सोय
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहूगाव : जगद्गुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने ‘अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव और आहे. माघ शुद्ध दशमी सोहळा शुक्रवारी दि. ७ फेब्रुवारीला होणार आहे. चार चाकी व दूचाकी वाहनांसाठी पायथ्यालाच पार्किंगची व्यवस्था केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५ बसची सोय केली आहे.
श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी पुणे जिल्यातील अनेक दिंडया तसेच लाखो भाविक दर्शनासाठी भंडारा डोंगरावर दरवर्षी येत असतात. दशमीच्या दिवशी अखंडपणे लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. व्याख्याते, युवा कीर्तनकार हभप गणेश शिंदे व सूर नवा ध्यास नवा या पर्वाच्या विजेत्या, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचा ‘तुका आकाशा एवढा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार असून दुपारी १.३० वा. डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठाण प्रस्तुत, डॉ. भावार्थ देखणे व सहकलाकार ‘बहुरूपी भारूड’ सदर करणार आहेत, अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.
वाहतूकनियोजनात बदल
दशमीच्या दिवशी डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी होणार असून चार चाकी व दूचाकी वाहनांसाठी पायथ्यालाच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर जाण्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी १५ बसची सोय करण्यात आली असून तसे सूचना फलक देखील लावण्यात आले असून सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
अभंगावर कीर्तन सेवा
आज पहाटेची काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात हभप नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अवीट, रसाळ वाणीतून गाथा पारायण संपन्न झाले. सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता हभप उद्धव महाराज मंडलिक यांची भक्तीचे ‘ते वर्म जयाचिये हाती, तया घरी शांती क्षमा दया, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊनिया’ या संत तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.