जाहिरात फलकांची प्रत्यक्ष जागेवर जावून तपासणी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, महानगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी, विविध आकाराचे आणि उंचीचे फलक उभारण्यात आलेले आहेत. प्रतिवर्षी मान्सुनपूर्ववादळ, वाऱ्यामुळे असे जाहिरात फलक पडण्याचे प्रकार शहरात व शहराबाहेर घडलेले आहेत. हा पुर्वानुभव विचारात घेता, यावर खबरदारीचे उपाय म्हणून महापालिकेने यापूर्वीच सर्व जाहिरातदार यांना मान्सुनपूर्व कालावधीत सर्व जाहिरात फलकांची प्रत्यक्ष जागेवर जावून तपासणी करणे. त्याचे फाऊंडेशन व्यवस्थित असल्याचे तसेच जाहिरात फलकांच्या लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करावी. त्यास गंजरोधक रंग लावावा. एखादा जाहिरात फलक धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तात्काळ निष्कासित करावा. त्यासोबतच जाहिरात फलक हा वादळ, वारा यामुळे पडणार नाही, यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

याबरोबरच नागरीकांनी या मान्सून कालावधीत अशा जाहिरात फलकाच्या खाली अथवा जाहिरात फलकाच्या आसपास थांबण्याचे टाळावे अथवा आपली वाहने लावू नयेत अथवा टपरी, हातगाडी, पत्राशेड लावून कोणी व्यवसाय करीत असल्यास ते ताबडतोब काढून घ्यावे. जेणेकरुन जीवित अथवा वित्तीय हानी होणार नाही. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन परवाना विभागाचे उप आयुक्त राजेश आगळे यांनी केले आहे.