तंत्रज्ञान काळात अध्यात्म गरजेचे

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मांडले विचार; निगडीत शनिवारपासून सात दिवसीय व्याख्यानमाला
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : ”सध्याचा काळ तंत्रज्ञानाचा असून यामध्ये तरूण, मध्यमवर्गीय, ज्येष्ठांसह सर्वांनाच अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येकाने समाजाला समोर ठेवून आत्मविश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे”, असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि.१५) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
श्रुतिसागर आश्रमाच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी, नवनगर विद्यालयामधील मनोहर सभागृहात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणीच्या बारा अभंगांवर माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या सुश्राव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती बोलत होते. यावेळी श्रुतिसागर आश्रमातील सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणीचे म्हणजे मोक्षांच्या अभंगावर येत्या १८ ते २४ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा ते आठ वाजता व्याख्यानमाला होणार आहे. ही व्याख्यानमाला मोफत असून जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुढे म्हणाले, ”गेल्या चार दशकांपासून अध्यात्मशास्त्राचा प्रचार व प्रसार केला जात आहे. वेदांच्यामधील अव्दैत तत्वज्ञान हे जगातील सनातन आणि सर्वोच्च तत्वज्ञान आहे. याच तत्वज्ञानाच्या आधारे प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील नैराश्य, ताणतणाव, अनेक दुःखे यांचा निरास होऊ शकतो. मनुष्याचे जीवन सुखी व सुसह्य होऊ शकते. हे अत्यंत उच्च तत्वज्ञान जगातील सर्व तत्वज्ञानांचाच नव्हे तर धर्मांचा आणि पंथांचा देखील गाभा आहे. हे ज्ञान विज्ञाननिष्ठ लोकांना विज्ञानाच्या भाषेमध्ये व सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचे मुख्य काम श्रुतिसागर आश्रमाच्या वतीने निरंतर केले जाते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून आश्रमाच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय आणि समाजोपयोगी कार्य करण्यात येत असल्याचेही स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले”.