कार्यकर्त्यांच्या बळावर “अब की बार 100 पार” : शंकर जगताप

थेरगावातील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ”अब की बार 100 पार” हा नारा आपल्याला पूर्ण करायचा आहे असा निर्धार थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केला. थेरगावच्या याच व्यासपीठावर पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण साजरा करू असा संकल्प देखील या निमित्ताने करण्यात आला.

आमदार शंकर जगताप यांच्या आमदारपदाची वर्षपूर्ती तसेच पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल थेरगाव, कामगार भावन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मंडलाध्यक्षांच्या तसेच प्रभागातील सदस्यांच्या वतीने आमदार शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले. मेळाव्याला विधान परिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तुषार हिंगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, सचिन साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, ज्येष्ठ उद्योजक उमेश चांदगुडे तसेच भाजपचे सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडळ प्रमुख, मंडल कार्यकारणी सदस्य प्रभाग अध्यक्ष, बुधप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते या निमित्ताने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे . पिंपरी चिंचवड मधील उमा खापरे, अमित गोरखे या कार्यकर्त्यांना आमदार बनवून भाजपने हे सिद्ध केले आहे . तुमच्या सारखे देवदुर्लभ कार्यकर्ते आहोत. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण 100 सदस्य संख्या नक्की पार करू याची खात्री आहे. असेही जगताप म्हणाले.
पाण्याचे नियोजन आणि नदी सुधारवर ”फोकस”
यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले, आमदार म्हणून काम करताना प्रस्तावित भक्ति शक्ति ते रावेत, वाकड, भोसरी, मोशी ते चाकण असा मेट्रोचा डीपीआर शासनाला दिला आहे. या कामांमुळे लवकरच वाहतूककोंडीचा प्रश्न कायम मिटेल असा मला विश्वास आहे. याशिवाय आता २०५१ ची लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून ७६० एम.एल.डी अतिरिक्त पाणी साठा उचलण्याबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. एस.टी. महामंडळासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आगार, शहरात विविध ठिकाणी अर्बन स्ट्रीट प्रकल्प उभारायचे आहेत. पवना, मुळा, इंद्रायणी नदी संवर्धनसाठी माझे प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. या तीनही नद्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे. यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून यामुळे आगामी काळात चिंचवडचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
कार्यकर्त्यांच्या संघटनातून पालिका निवडणूक यशस्वी करू
भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे काम करणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विश्वासाने संधी दिली. या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चिंचवड विधानसभा प्रभारी तसेच शहराध्यक्ष म्हणून काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनीच हातभार लावला. आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन महत्त्वाचे आहेत या दृष्टीने पुढे काम करायचे आहे. याच संघटनाच्या माध्यमातून पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण थेरगाव मधील याच मंचावर साजरा करून असा संकल्पही या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.

