नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला अटक!

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सह आरोपी
पुणे : वैष्णवी हगवणे ला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियासह निलेश चव्हाण ला बावधन पोलिसांनी सह आरोपी केले आहे .तर वारजे पोलिसांनी वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे .निलेश हगवणे हा वैष्णवीची ननंद असलेल्या करिष्मा हगवणेचा जवळचा मित्र आहे. निलेश चव्हाण हा गेल्या दहा दिवसापासून फरार होता. त्याला आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतले आहे.
निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी असून त्याला अटक होण्याआधीच तो फरार झाला होता. निलेश चव्हाण च्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार पदके तर पुणे पोलिसांनी तीन पदके तयार करून राज्यात आणि देशात त्याचा शोध घेत होती .अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे .निलेश चव्हाण यांनी देशाबाहेर पलायन करू नये, यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे .वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसात गुन्हा दाखल आहे .21 मे पासून तो फरार होता .महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यातून तो नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
निलेश चव्हाण यांच्या विरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात निलेश आणि त्यांचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला तरी देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली होती.मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाण च्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याची माहिती आहे. निलेश चव्हाण हा बांधकाम व्यवसायिक असून तो फोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे .
शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा .वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेण्यासाठी तिच्या माहेरचे लोक कर्वेनगर भागातील चव्हाण यांच्या घरी गेले असता निलेशने त्यांना पिस्तूल दाखवून घराबाहेर हाकलून दिले. बाळाचा ताबा देण्यासही त्याने नकार दिला होता. यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कस्पटे कुटुंबियांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

