विरोध डावलून पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अण्णा बनसोडे यांना उमेदवारी

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालपर्यंत पक्षांतर्गत तसेच महायुतीतून होत असलेला तीव्र विरोध डावळून अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना ही उमेदवारी दिली आहे.
बनसोडे यांची उमेदवारी जाहीर होताच पिंपरीतील त्यांच्या कार्यालजवळ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. फटाके वाजवत तसेच पेढे भरवत समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल हे देखील उपस्थित होते.
पिंपरी विधानसभेतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही अशी भूमिका महायुतीतील इच्छुकांनी घेतली होती. बैठक घेऊन काम न करण्याची शपथ देखील घेतली होती. मात्र त्यांचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता अजित पवार यांच्यासह अण्णा बनसोडे विरोध करणाऱ्या महायुतीतील इच्छुकांची नाराजी दूर करणार की यात कोणी बंडखोरी करणार हे पाहणं देखील तितकेच महत्वाचं ठरणार आहे.