हिंजवडीत प्रेम प्रकरणातून खून; तरुणास अटक!

पिंपरी : दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध जुळवण्याच्या रागातून पूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार सहा ऑगस्ट रोजी मारुंजी ता. मुळशी येथे घडली. सागर साहेबराव गायकवाड (वय 22, रा. वैष्णवी, पीजी सेवन स्टार सिटी, मारुंजी, मूळ- रा. येवला, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी नरसिम्हा तिरूपालू दरिषी (वय 32, रा. वैष्णवी पीजी सेवन स्टार सिटी, भरत मेडिकल जवळ, लक्ष्मी चौक, मारुंजी, ता. मुळशी, मुळगाव- कोंडा बितरगुंडा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दिनेश महादेव झांबरे (वय 23, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या- रा. मारुंजी, भुमकर चौक, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि जखमी तरुणीचे शालेय जीवनापासून प्रेम संबंध होते. संबंधित तरुणी बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. शिक्षणादरम्यान मारुंजी येथे पेइंग गेस्ट म्हणून रहात होती. व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सागर गायकवाड यांच्यासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याचा राग मनात धरून आरोपी दिनेश याने गुरुवारी दुपारी सागर आणि तरुणी राहत असलेल्या पीजीच्या इमारतीत आला. प्रेयसी ही मॅनेजर सागर साहेबराव गायकवाड यांच्या सोबत राहत असल्याच्या कारणावरून पीजी मॅनेजर सागर साहेबराव गायकवाड यास लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून खून केला. तसेच प्रेयसी हिस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले. , हल्ल्यानंतर आरोपी त्याच्या पांढऱ्या रंगाच्या ईरटीका कार नंबर एम एच १३ इ के 58 28 मधून पंढरपूरकडे पळून जात असताना उरुळी कांचन पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपीला अटक केली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगनेकर पुढील तपास करीत आहेत.

