महापालिका शाळा ज्ञानासोबतच क्रीडा संस्कृतीतही आघाडीवर!

रग्बीमध्ये राज्यस्तरीय रौप्यपदक तर स्क्वॅशमध्ये विभागीय पात्रता महापालिका शाळांची दुहेरी कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे .नुकत्याच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या शाळांनी रग्बी व स्क्वॅश या खेळांमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले.

या स्पर्धेत कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी येथील विद्यार्थी दया जाधव, अबुजर अन्सारी आणि सुमित गायकवाड यांनी पुणे जिल्हा रग्बी संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने एकूण सात सामने खेळत राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि बीड संघाविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत १-२ अशा फरकाने उपविजेतेपद पटकावले. पुण्याच्या वतीने झालेल्या या सामन्यातील एकमेव ट्राय दया जाधवने नोंदवत आपले क्रीडा कौशल्य दाखवून दिले. महापालिकेच्या शाळांमधून राज्यस्तरावर प्रथमच मिळालेले हे रौप्यपदक विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरासाठी ऐतिहासिक ठरले आहे.
श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी येथील विद्यार्थ्यांनी स्क्वॅश या नव्याने समाविष्ट झालेल्या खेळात दमदार कामगिरी केली. सूरज मदने याने १४ वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदकासह विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर प्रथमेश कुंभार याने १७ वर्षाखालील गटात चौथा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत स्थान निश्चित केले. या यशामागे प्रशिक्षक सुशील सर यांचे मार्गदर्शन आणि शाळेचा सक्रिय पाठिंबा मोलाचा ठरला.
विद्यार्थ्यांची चिकाटी, परिश्रम आणि खेळाडूवृत्ती या यशामागे स्पष्टपणे दिसून येतात. असे उपक्रम आणि स्पर्धांमधील सहभाग विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघभावना आणि आत्मविश्वासाची शिकवण देतात. त्यामुळे शाळा ही केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता व्यक्तिमत्त्व घडविण्याचे व्यासपीठ ठरते. हेच संस्कार त्यांच्या पुढील वाटचालीस भक्कम पायाभूत ठरतील. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
महापालिका शाळा केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरत्या मर्यादित न राहता, क्रीडा व इतर उपक्रमांतूनही विद्यार्थ्यांना घडवत आहेत. हेच विद्यार्थी उद्याच्या स्पर्धात्मक जगात शहराचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे शिक्षण विभागाचा सर्वांगीण विकासाचा उद्देश प्रत्यक्षात उतरत आहे. ही प्रक्रिया सतत सुरू राहावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. – किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका