सार्वजनिक स्वच्छतेत नियमभंग करणांवर महापालिकेची कडक दंडात्मक कारवाई!

फ क्षेत्रीय कार्यालयाची धडक मोहीम १७ दिवसांत १.६० लाखांची दंड वसुली
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध नियमभंग करणाऱ्यांकडून एकूण १ लाख ६० हजार ७०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व आरोग्य कार्यकारी अधिकारी तथा सहा.आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई राबवण्यात आली.
शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याच्या दिशेने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कचरा विलगीकरणाबाबत जागरूक राहावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर, कचरा वर्गीकरण न करणे, दुकानदारांकडे दोन डस्टबिन न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे अशा नियमभंगांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. या धडक कारवाई मोहिमेत सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची दंडात्मक कारवाई
(कालावधी : १ नोव्हेंबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५)
• बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर – ८५ हजार रुपये
• कचरा वर्गीकरण न करणे – १२ हजार ७०० रुपये
• उघड्यावर कचरा टाकणे – ३४ हजार रुपये
• दुकानांमध्ये दोन डस्टबिन न ठेवणे – २६ हजार रुपये
• सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे – ३ हजार रुपये
पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून,नागरिकांनी देखील स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करून आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे घन कचरा व्यवस्थापन अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई पुढेही सुरू राहील. -डॉ. प्रदीप ठेंगल उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने केलेली कारवाई ही स्वच्छ पिंपरी-चिंचवड निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई केली जाईल. — अतुल पाटील, फ क्षेत्रीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका

