वाकड–म्हातोबानगर परिसरात महापालिकेची ४१ झोपड्यावर कारवाई!

२४ मीटर डीपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील बांधकामावर निष्कासनाची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील २४ मीटर डिपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे, दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधा, रस्ते व पायाभूत प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. शहराचा नियोजित आणि सुटसुटीत विकास साधण्यासाठी या आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये. तसेच, आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे भविष्यात विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा अतिक्रमणांवर नियमानुसार निष्कासनाची कारवाई केली जाईल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

