फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेची कडक कारवाई सुरू!

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेची कडक कारवाई सुरू!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही ज्यांनी अद्याप थकीत कर भरणा केला नाही, अशा मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच थकबाकीदार मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार आहे. तरी थकबाकीदारांनी आपल्या कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी. ज्यांचा कर थकीत आहे, त्यांनी तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

Viara Ad 2
Viara Ad 2

शहरात ५० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २५,१३० मालमत्ताधारक आहेत, तर ५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ७८४ मालमत्ताधारक आहेत. कर संकलन विभागाच्या १८ कार्यालयांमार्फत थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

धनादेश न वटलेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील : – ज्या मालमत्ताधारकांचे धनादेश वटले नाहीत, त्यांना वारंवार सूचना देऊनही रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या कारवाई पथकाने अशा मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. कर संकलनासाठी महापालिकेची शहरात १८ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. कर संकलन मोहिमेसाठी विभागाकडून गट लिपिक, सहायक मंडलाधिकारी यांच्याद्वारे नागरिकांना टेलीकॉलिंग करून कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

सर्वाधिक थकबाकीदार थेरगावमध्ये :- सर्वाधिक १४,०६२ थकबाकीदार थेरगावमध्ये असून, त्यानंतर चिखली ११,३९५, चिंचवड परिसरात ९,६४२, सांगवी ८,५०७, भोसरी ७,३९६, किवळे ६,६२५, निगडी प्राधिकरण ६,१७६, मोशी ६,१०६, मनपा भवन ५,९७८, पिंपरी वाघेरे ४,९९९, वाकड ४,९६२, कस्पटे वस्ती ४,८६५, आकुर्डी ४,४९३, चऱ्होली ३,७४६, दिघी-बोपखेल ३,६१८, फुगेवाडी-दापोडी ३,४६८, तळवडे २,९०५, पिंपरी नगर २,६१५.

पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणावर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. नागरिकांना वेळोवेळी आवाहन, नोटिसा आणि दूरध्वनीद्वारे सूचनाही देण्यात आल्या. तरी देखील अनेक थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नळजोडणी तोडणे, मालमत्ता जप्ती करणे, अशी कठोर कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. तरी मालमत्ता कराचा भरणा करून जप्ती व दंडात्मक कारवाई टाळावी. — प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांविरोधात कारवाई करत आहेत. अशी कटू कारवाई टाळून नागरिकांनी वेळेत कर भरावा . ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणा करणाऱ्यांना सामान्य करामध्ये ४ टक्के सूट देण्यात येत आहे. -अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"