फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विज बिलात ५ कोटी ९१ लाखांची बचत!

सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विज बिलात ५ कोटी ९१ लाखांची बचत!

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून पर्यावरणपूरक वाटचालीला मिळतेय गती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारली आहे. यामध्ये पिंपरी येथील महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, रुग्णालये अशा विविध ८६ ठिकाणी सौर पॅनेल्स महापालिकेने बसवले आहेत. याद्वारे सप्टेंबर २०२५ पर्यंत ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून आर्थिक बचतीबरोबरच शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीला चालना मिळत आहे.

हरित ऊर्जेकडे वाटचाल
सौर ऊर्जेच्या वापरामुळे महापालिकेच्या वीज खर्चात मोठी घट झाली आहे. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आणखी १३ ठिकाणी ४५० किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेचे काम हाती घेतले असून, ते प्रगतीपथावर आहे. याशिवाय ५८ ठिकाणी ४ मेगावॅट क्षमतेची सौर प्रणाली उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर होऊन पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील ताण कमी होईल आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक वाटचालीला गती मिळेल.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
प्रकल्पाची क्षमता: ३ मेगावॅट/प्रतितास ; एकूण तयार युनिट्स वीज: ५९ लाख १७ हजार ११२ (सप्टेंबर २०२५ अखेर): वीजबिलामध्ये बचत: ५ कोटी ९१ लाख ७६ हजार ११२ रुपये

नियोजित प्रकल्प क्षमता: ४ मेगावॅट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सध्या आवश्यक असणारी विजेची गरज वेस्ट टू एनर्जी व सोलर एनर्जी यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. यातून आर्थिक बचतीसह आगामी काळात पिंपरी चिंचवड महापालिकेस ‘नेट झिरो’ बनवण्याचा महापालिकेचा मानस आहे.

हरित ऊर्जेकडे वाटचाल ही केवळ विजेची बचत नसून, ती शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवून महापालिका पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत या उद्दिष्टांना साध्य करत असून यापुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील. — अनिल भालसाखळे, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"