फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध : तृप्ती सांडभोर

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध : तृप्ती सांडभोर

कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी ई वाहनाचे वितरण
पिंपरी: दिव्यांग नागरिकांना सबलीकरण, स्वावलंबन आणि सन्मानाची वागणूक देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत आहे. समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम सुरू आहे. कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, शिक्षण-सुविधा आणि पथदर्शी कल्पनांमुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन योजनांचे उद्घाटन व विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (माजी आयएएस), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, यांच्यासह महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, सोनाली नवांगुळ,डॉ. विना तारकुंडे, संगीता जोशी यांच्यासह शहरातील दिव्यांग बांधव, त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या की, समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणासाठी २०२४-२५ मध्ये तब्बल ४५ कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून १० हजार ६०१ लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत देण्यात येते. दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी तीन चाकी ई-वाहनावरील फिरते दुकाने, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन, घरपोच सर्वेक्षण, लवकर निदान-उपचार अशा पथदर्शी योजना राबविण्यात येत आहेत असे त्या म्हणाल्या.

मानव कांबळे म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी मागणारे नव्हे, तर देणारे होण्याची भावना जोपासावी. त्यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग बांधव नेहमीच सहकार्याची भूमिका निभावतील, फक्त प्रशासनानेही तितक्याच संवेदनशीलतेने साथ देणे गरजेचे आहे. शहरातील दिव्यांग भवन हे आमचे तीर्थक्षेत्र असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्याचे कार्य सातत्याने करत आहे, असेही ते म्हणाले.

भावनांच्या तालासूरात बरसला कलात्मक आविष्कार
आत्मविश्वासाने रंगमंच उजळवणारे दिव्यांग कलाकार… मंचावर थिरकणारी त्यांची निखळ कला… आणि त्यांना मिळणारी टाळ्यांची दाद… अशा उत्साहपूर्ण वातावरणात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सुरांच्या संगतीत आणि भावनांच्या उत्स्फूर्त आविष्कारात न्हाऊन निघाले. महापालिकेने आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"