फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पुणे-मुंबई महामार्ग ते चिंचवडगाव पूल पाडणार

पुणे-मुंबई महामार्ग ते चिंचवडगाव पूल पाडणार

लोहमार्गावरील हा पूल धोकादायक असल्याने तो पाडून नव्याने बांधण्यास मान्यता

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गादरम्यान असलेल्या लोहमार्गावर नव्याने पूल उभारण्याच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा पूल ४७ वर्षे जुना आहे.

चिंचवड येथील रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने वाहतुकीसाठी दोन समांतर रेल्वे पूल अस्तित्वात आहेत. त्यापैकी चिंचवड स्टेशनवरून गावाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूकडील पुलाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यावरून अवजड वाहनांना यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. बस आणि अवजड वाहनांना पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली होती.

केव्हा उभारला होता पूल?
शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांच्या वापरानंतर आता ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडावा, असे पत्र रेल्वेने महापालिकेला नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहेत. त्यामुळे आता एकच पूल पाडणार की दोन्ही पूल पाडून नव्याने बांधले जाणार, याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही.

तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्यावतीने या पुलाची पाहणी करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी असलेला पूल पाडून तो नव्याने बांधणे आवश्यक आहे. त्याची दखल घेत आवश्यक आर्थिक तरतूद करून जुना पूल पाडून नव्याने पूल उभारणी करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. नव्या पुलामुळे मुंबई-पुणे महामार्ग ते चिंचवडगाव वाहतूक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार बोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह संबंधित विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"