डेंग्यू, मलेरिया आजार रोखण्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त घरांची तपासणी!

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर
पिंपरी : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ५ लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, १ हजार २३८ भंगार दुकाने, १ हजार ६०९ बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या ३ हजार ४३१ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून ६२४ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करीत २२ लाख २४ हजार इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक व्यापकपणे राबवण्यात येत आहेत. औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे.
जनजागृतीवर दिला जातोय भर
कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यावरही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष भर दिला जात आहे. यामध्ये नियमित औषध फवारणी, घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण, प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, दर आठवड्याला टाक्या आणि पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करावी, पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत करण्यात आलेली कारवाई
• आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार ७६६ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९ हजार ६८० घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. • आतापर्यंत २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १० हजार ५४८ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. • १ हजार २३८ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. • १ हजार ६०९ बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी देखील आपले घर व परिसरात स्वच्छता राखावी. तसेच आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा. — सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका