मोफत आरोग्य शिबिरात जाधववाडी येथे ५५० हून अधिक नागरिकांचा सहभाग!

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासण्या व औषधांचे वितरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागातर्फे नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त जाधववाडी येथील सावतामाळी सभागृह येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ५५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात आकुर्डी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने नागरिकांना वजन, उंची, बीएमआय (शरीर वस्तुमान निर्देशांक), रक्तदाब मोजणी, संपूर्ण रक्त तपासणी (सीबीसी), पीबीएस, अकस्मात रक्तातील साखर तपासणी (बीएसएल-आर), सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, नियमित लसीकरण, छातीचा एक्स-रे, थुंकी तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी यांसह विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाक-कान-घसा व फिजिशियन तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आणि सर्व प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.
शिबिरात वैद्यकीय विभागाच्या सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, आकुर्डी रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. हरिदास शेंडे, डॉ. बाळासाहेब होडगर व इतर अधिकारी उपस्थित होते. शिबिराचे यशस्वी नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) शाहीन खान यांनी विशेष परिश्रम घेतले.
महापालिका नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी नेहमी कटिबद्ध आहे. अशा शिबिरांद्वारे लोकांना त्यांच्या घरा जवळील परिसरात आरोग्य तपासण्या व उपचार सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करून देणे, हे आमचे प्राधान्य आहे. आरोग्य तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपचारांमुळे गंभीर आजार टाळता येतात. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीस प्राधान्य द्यावे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका