खेळाच्या प्रगतीसाठी झटणारा ढाण्या वाघ

- दशरथ लांडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक
कबड्डी हाच श्वास मानणारे आणि या खेळासाठी संपूर्ण आयुष्य व्यतित करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ लांडगे म्हणाले, आमदार महेश लांडगे माझा पुतण्या आहे. मात्र, खेळाच्या प्रगतीसाठी झटणारा ढाण्या वाघ आहे. त्याचं काळीजं जिगरीचं आणि ध्येय उंचीचं आहे. म्हणूनच मैदानी खेळांवरील त्याचं प्रेम आम्हांला भावतं आणि आवडतं. भोसरीला कुस्तीची जुनी परंपरा आहे. घराघरात मल्लविद्येचे धडे घेणारी मुलं होती. त्यामुळे त्या काळी कबड्डीकडे विशेष लक्ष नव्हतं. मला मात्र वयाच्या अठराव्या वर्षापासूनच कबड्डीविषयी विशेष आकर्षण निर्माण झालं. दोनचार दोस्त मिळून आम्ही झाडाखाली किंवा शेताच्या खळ्यावर सराव करीत असे. ते पाहून येणारे-जाणारे वेड्यात काढत असे. प्रसंगी हिणावत होते. मात्र, काही झालं तरी कबड्डी सोडायची नाही, असे ठरविलं होतं. त्यामुळे प्रसंगी शाळेला दांडी मारून आम्ही कबड्डी खेळत असे.

सराव करता करता माझ्यासह झुंबरशेठ, जठार आणि सहकाऱ्यांचा संघ तयार केला. एका स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवला. बक्षिसाची ढाल घेऊन गावात आल्यावर थोरामोठ्यांनी कौतुक केलं. काहींनी रोख रक्कम देऊ केली. त्यामुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून आजतागायत भोसरीचा भैरवनाथ संघ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवत आहे. या संघाचे खेळाडू कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. सराव मैदानावर खेळ पाहण्यासाठी येणारा महेश कबड्डीचा असिम चाहता आहे. त्यामुळे या खेळाशी त्याचं नातं जवळचं आहे. राजकारणात तो जसाजसा यशस्वी होत गेला तसा या खेळासाठी काहीतरी सर्वोत्तम करण्याची त्याची इच्छा बळावत गेली, असे दशरथदादांनी आवर्जून नमूद केले.
भोसरीमध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्राची इमारत स्थापन करून पूर्णत्वास जाईपर्यंत महेशने केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, याकडे लक्ष वेधून दशरथदादा म्हणाले, खेळाडूंविषयी त्याचं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा शब्दांत सांगणं कठीण आहे. प्रत्येकाला तो मित्र वाटतो. महिला खेळाडूंसाठी तो भाऊ वाटतो. ज्येष्ठांसाठी तो आदर्श मुलगा असतो. गावातील रामदास लांडगे, दत्ता माने, गोपीकृष्ण धावडे, मच्छिंद्र लांडगे, विराज लांडगे, नारायण गव्हाणे, स्वप्निल शेलार यांच्यासह अनेक खेळाडूंना त्याने भक्कम पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची मदत करण्याची वृत्ती खेळावरील भक्ती स्पष्ट करते.
राष्ट्रीय खेळाडू मारुती कंद यांच्या गौरवार्थ १९९९-२००० मध्ये भोसरीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती. त्याच्या नियोजनात महेश होता. त्यावेळी त्याने घेतलेले कष्ट त्याच्या राजकीय कौशल्याची चमक दाखविणारे होते. हा मुलगा भविष्यात उज्ज्वल यश मिळविल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री निर्माण झाली होती. त्यानंतर वेळोवेळी मैदानावर येऊन संवाद साधणं, खेळाडूंच्या सुखदुखात सहभागी होणं. त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं हे त्याच्या रक्तातचं भिनलेलं आहे. तो सर्वांचा जिवाभावाचा सखा आणि कबड्डीचा पाठीराखा आहे.
आज वयाच्या ८३व्या वर्षीही रोज मैदानावर जाऊन खेळाडूंना प्रशिक्षण देणारे आणि कबड्डी हाच प्राण मानणारे दशरथदादा महेशविषयी बोलताना भारावून जातात. भोसरीतच नव्हे तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात त्याने कबड्डीसाठी दिलेल्या योगदानाविषयी भरभरून बोलतात. तेव्हा त्यांचा हा लाडका महेश भविष्यात आमदार नव्हे तर क्रीडा खात्याचा मंत्री व्हावा, अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत.