फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

अण्णा बनसोडे यांची राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड!

अण्णा बनसोडे यांची राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड!

पानटपरीचालक ते मानाचे उपाध्यक्षपद
पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले बनसोडे यांचा राजकीय प्रवास पानटपरीचालक ते मानाचे पद असा राहिला आहे.

महायुतीमध्ये विधानसभा उपाद्यक्षपद राष्ट्रवादी कॅाग्रेसपक्षाच्या वाट्याला आले. सत्ताधारी महायुतीचे पाशवी बहुमत विधानसभेत असल्याने विरोधी पक्षांनी आपला उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविला नाही,त्यामुळे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बनसोडे यांचे अभिनंदन केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले बनसोडे यांची चिंचवड स्टेशनला पानाची टपरी होती. तेथून त्यांची ओळख दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे आणि शहरातील नेते आझमभाई पानसरे यांच्याशी झाली. समाधान गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्रारंभ झाला. १९९५ मध्ये युवक कॅांग्रेसचे ते शहर सरचिटणीसही राहिले.
आनंदनगर प्रभागातून १९९७ मध्ये ते प्रथमच महापालिकेवर निवडून आले. २००२ मध्ये श्रीधरनगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. २००७ मध्ये उद्योगनगर प्रभातून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले.

viara ad
viara ad

पिंपरी विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये प्रथमच अस्तित्वात आल्यानंतर राखीव मतदारसंघातून बनसोडे यांना राष्ट्रवादी कॅांग्रेसने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर ते २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. तर, २०२४ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला. या संपूर्ण राजकीय प्रवासात उपमुख्यमंत्री पवार यांचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली. पिंपरी चिंचवड शहराला प्रथमच बनसोडे यांच्यारुपाने मानाचे पद मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत. यामध्ये विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन यांचा समावेश आहे. बनसोडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यांना महत्त्वाचे पद देऊन पवार यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पक्षामध्ये एकनिष्ठ राहिल्यास पद मिळू शकते, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.
…..

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"