बिझनेस गेमच्या वादातून अल्पवयीन मुलाचा खून!

पिंपरी : बिझनेस गेम खेळत असताना झालेल्या वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. ३) पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली.
गणेश नागनाथ कुर्हाडे (वय १६, रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याचे वडील नागनाथ अर्जुन कुर्हाडे (वय ४२) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहेब हबीब शेख (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलीसांनी अटक केली आहे.
मृत गणेश याने दहावीची परिक्षा दिली होती. तर, आरोपी सोहेब याने बारावीची परिक्षा दिली आहे. फिर्यादी नागनाथ यांचा १४ वर्षीय मुलगा कार्तिक आणि आरोपी सोहेब हे शनिवारी (दि. ३) बिझनेस नावाचा गेम खेळत होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत गेला. कार्तिक याने आपला भाऊ गणेश याला बोलविले. गणेश याने आरोपी सोहेब याला याबाबत जाब विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या आरोपी सोहेब याने कार्तिकचा भाऊ गणेश याच्याशी भांडण करीत त्याला सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून त्याचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार तपास करीत आहेत.
पोलिसांवर दगड फेकून मारणार्या तिघांवर गुन्हा
पिंपरी -: आरडाओरडा करत गोंधळ घालणार्या तरूणांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना दगड फेकून मारणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ मे रोजी रात्री अकरा वाजता हिंजवडीतील लक्ष्मी चौकाजवळ घडली.
नवनाथ बबन गवारी (वय ३०, रा. माण, ता. मुळशी), रवी उत्तम माने (वय ३२,रा. वाकड) आणि महेश दिनकर साबळे (वय २८, तिघे रा. हिंजवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक प्रशांतसूर्यवंशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी लक्ष्मी चौकाजवळ आरडाओरडा करीत होते. त्यावेळी फिर्यादी व इतर कर्मचारी तिथे गेले असता आरोपींनी गोंधळ घालत फिर्यादी यांना दगड फेकून मारला. तसेच, पाठीमागून पकडले. आम्ही गाववाले आहोत, ही आमची जागा आहे. आमच्या जागेत आम्ही कायपण करू, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला. फौजदार कांदे तपास करीत आहेत.
