Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
महाराष्ट्र

पवना जलवाहिनी प्रकल्पासाठी ३ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस समवेत बैठक!

पवना जलवाहिनी प्रकल्पासाठी ३ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस समवेत बैठक!

मावळ, पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून बैठक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि.३ जुलै २०२६ रोजी संयुक्त बैठक होणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत समन्वय केला असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागवण्यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीला पिंपरी-चिंचवड आणि मावळातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

viara vcc
viara vcc

पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सध्या पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्येही या विषयावर मतमतांतरे आहेत. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पवना धरणावरील जलवाहिनी प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक व्हावी आणि प्रकल्पाला गती द्यावी, यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीसाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे आदी लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी असे प्रशासकीय अधिकारी निमंत्रित आहेत.

भाजपा महायुती सरकारने वर्षभरापूर्वीच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यापूर्वी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठकीसंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता विधानभवन, मुंबई येथे बैठक नियोजित केली आहे. त्यामुळे सुमारे ४० लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

“पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना मावळच्या शेतकऱ्यांचे हित, स्थानिक जनभावना, भविष्यातील पाणीगरजा आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता या सर्व बाबींचा समतोल विचार होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या चर्चेमुळे सर्व संबंधितांमध्ये समन्वय निर्माण होऊन सर्वमान्य तोडगा निघेल,” असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

“पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यासाठी सातत्त्याने हा प्रश्न आम्ही विधानसभा सभागृहात आणि मंत्रीमहोदय यांच्या बैठकांमध्ये मांडला आहे. त्याला आता मूर्तरुप येताना दिसत आहे. हा प्रकल्प राबविताना मावळमधील शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना व हितालाही तितकेच महत्त्व दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत सर्व संबंधित पक्षांना विश्वासात घेऊन सकारात्मक, सर्वसमावेशक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. कोणावरही अन्याय न होता ४० लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीप्रश्नाचे शाश्वत समाधान मिळविणे हेच आमचे ध्येय आहे. – महेश लांडगे, आमदार, पिंपरी-चिंचवड,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"