बनावट कागदपत्राच्या आधारे व्यवस्थापकाने केला 11कोटी रुपयांचा अपहार!

अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आळंदी मध्ये फसवणूक
आळंदी: बनावट कागदपत्राच्या आधारे खोटे कर्ज व सोनेतारण कर्ज दिल्याचे भासवून अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आळंदी या पतसंस्थेची सुमारे अकरा कोटी तीन लाख 13 हजार 380 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 24 नोव्हेंबर 2025 चे पूर्वी घडली असून शुक्रवार 23 जानेवारी रोजी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संचालक संजय जयसिंग शिर्के रा. घर. नंबर 865, मरकळ रोड स्टेट बँकेसमोर आळंदी देवाची, ता. खेड यांनी फिर्याद दिली आहे. अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे व्यवस्थापक बाळू अर्जुन पवार (रा. पगडे वस्ती चर्होली खुर्द, ता. खेड), संजय मोहन लांडगे (रा. हडपसर, पुणे), पूर्णाानंद अरविंद खोलम (वय 52, रा. चर्होली बुद्रुक बाजारपेठ, ता. हवेली )अशी आरोपींची नावे असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे व्यवस्थापक- सचिव आरोपी क्रमांक एक यांना संचालक मंडळाने पूर्ण कारभाराबाबत अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा गैरवापर करून व्यवस्थापक आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी आपसामध्ये संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारावर बनावट कर्जदार यांना सोने तारण कर्ज देऊन कर्जाची रक्कम परस्पर काढून घेतली. पतसंस्थेने सोनार व ऑडिटर यांची नियुक्ती केली होती त्यांनी खोटे अहवाल देऊन सभासद, संचालक मंडळ यांचा विश्वासघात केला आहे .आरोपी क्रमांक एक याने बनावट कागदपत्राच्या आधारे खोटे कर्ज दिल्याचे भासवून कर्जाची रक्कम परस्पर काढून अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची अकरा कोटी तीन लाख 13 हजार 380 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.

