प्रचारात महायुतीची आघाडी, महाविकास आघाडीची पिछाडी

पिंपरी : (नेताजी मानकर) – महायुती आणि महाआघाडीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करत राज्यात प्रचाराचा बार उडवून दिला. पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघातील तीनही उमेदवार जाहीर करून महायुतीने शहरात प्रचाराचा धुराळा उडवला. दरम्यान, महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या भरमसाठ आहे मात्र, जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होत नसल्याने वातावरण असूनही प्रचारात पिछाडी आहे. मतदान २० नोव्हेंबरला असल्याने अवघे २३ दिवस बाकी असतानाही उमेदवार ठरत नसल्याने महाविकास आघाडीचा संपूर्ण खेळ विस्कटत चालला आहे.
पिंपरी चिंचवड शहरावर सत्ता कोणाची महायुतीची का महाविकास आघाडीची हे विधानसभेलाच निश्चित होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकित शहरावर भाजपचा कब्जा असणार, अजित पवार पुन्हा बस्तान बसविणार की शरद पवार यांचे राज्य येणार यावर निवडणुकित शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीने चपळाई दाखवत आपले उमेदवार जाहीर केले आणि तीनही मतदारसंघातून प्रचाराला जोरदार सुरवात केली. परिणामी महायुती पहिल्याच फेरित प्रचारात आघाडीवर आहे. केंद्र, राज्य सरकारवरच्या नाराजीमुळे सामान्य मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुला असूनही केवळ उमेदवार निश्चित होत नसल्याने मोठी पिछेहाट झाली आहे.
भोसरीत महाश लांडगेंची आघाडी –
भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी सर्वात मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसते. उमोदवारीची खात्री असल्याने अवघ्या पंधरा-वीस दिवसांत आमदार लांडगे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि एक फेरी पूर्ण केली. सोशल मीडियातून प्रचारातही त्यांच्या इतकी आघाडी कोणाचीच दिसत नाही. तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. गव्हाणे यांनी महिनाभर पायपीट केली, लांडगे यांच्या विरोधातील सर्व कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची मोट बांधली आणि हवा निर्माण केली. प्रत्यक्षात जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार असे म्हणत गव्हाणे यांच्या उमेदवारीलाच खो द्यायचा आटापीटा महाआघाडीत सुरू झाला. शिवसेनेचे रवी लांडगे यांचे नाव उमेदवारीत फायनल होणार अशी आवई उठली आणि धुमडाक्यात सुरू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी सोडून गव्हाणे यांना चार दिवस मुंबईत तळ ठोकायची वेळ आली. आमदार लांडगे यांच्या विरोधात तापवलेल्या वातावरणावर अक्षरशः पाणी फेरल्याने आता महाविकास आघाडी पिछाडीवर गेली आहे.
चिंचवडसुध्दा शंकर जगताप यांची हवा –
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधत भाजपमधून आणि नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून मोठा विरोध झाला. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला मिळावी म्हणून भाजपचा प्रचार करणार नसल्याचे ८-१० माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. अशा परिस्थितीत भाजपने शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचाराची राळ उडवून दिली. जगताप फॅमिलीतील मतभेद संपल्याचे लक्षात आल्यावर विरोध करणाऱ्यांचा विरोध मावळला. शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, चंद्रकांत नखाते या सर्व माजी नगरसेवकांचे बंड फसले. दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, चंद्रकांत नखाते यांनी सर्वांनी हवा केली पण पंधरा दिवसांत एकालाही त्यात यश आलेले नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे या चर्चेतच पुणे-मुंबई वाऱ्या करून इच्छुकांची दमछाक झाली. जगताप यांच्या विरोधात एकाने लढायचे आणि सर्वांनी त्याच्या मागे उभे रहायचे, असे ठरले पण तिथेही एकमत झाले नाही. खासदार अमोल कोल्हे हे कलाटे यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे तटून बसले पण, भोईर, काटे, भोंडवे, नखाते त्यासाठी तयार नाहीत. हा गोँधळ इतका वाढला की त्या वेळात भाजपचे शंकर जगताप यांनी प्रचारात बाजी मारली आणि मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला. अगोदर शंकर जगताप जिंकणे अशक्य असे म्हटले जायचे आता तेच जिंकतील असे नॅरेशन सेट झाले.
पिंपरीत आमदार बनसोडेंच पुन्हा –
पिंपरी राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना आता पुन्हा उमेदवारी देऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या २७ माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. मतदारांमध्ये प्रचंड नाराजी, कुठलेही काम केलेले नाही, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला ते कधीच उपलब्ध नसतात, फोन उचलत नाहीत आदी असंख्य तक्रारी त्यांच्याबद्दल अनेकांनी केल्या. उमेदवारी त्यांनाच दिली तर पराभव निश्चित होणार, असेही सांगून झाले. राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष योगेश बहल यांच्यासह सर्वांनी विरोध केला मात्र, अजित पवार यांनी त्यांनाच पुन्हा संधी दिली. भाजपनेही बनसोडे यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव केला होता.
कुठल्याही प्रतिक्रिया न देता बनसोडे यांनी दौरा सुरू केला. नाराजांच्या गाठीभेटी सुरू केल्या आणि प्रचाराची व्युहरचना केलीसुध्दा. दुसरीकडे महाविकास आघाडीतून उमेदवार कोण, जागा कोणाला यावर एकमत होत नाही. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी खास शिफारस केल्याने राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, बनसोडे यांचा पराभव करायचाच तर त्यांना जशास तसा तोंड देणारा भक्कम उमेदवार पाहिजे, अशी मागणी पुढे आली. त्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका सिमा सावळे यांचे एकमेव नाव अनेकांनी सुचविले. सावळे यांनी सर्वात अगोदर प्रचाराला सुरवात केली पण, उमेदवारी कोणत्या पक्षाची तेच निश्चित होत नसल्याने प्रसंगी त्या अपक्ष लढणार का, अशी चर्चा रंगली आहे. जागा शिवसेनेकडे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तोच घोळ संपत नसल्याने इथेही महाविकास आघाडी मागे पडत गेली