फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

बनावट ॲपद्वारे गुंतवणुकीचे अमिष : ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

बनावट ॲपद्वारे गुंतवणुकीचे अमिष : ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये बनावट ॲपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ७७ लाख ११ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. शुभम सोरटे व आदित्य इंगळे या आरोपींना पुणे व जालना येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवर ब्लॉक ट्रेडींग संदर्भात जाहीरात दिसली होती. शेअर मार्केटमध्ये आवड असल्याने त्यांनी सदर जाहीरातीवर क्लिक केले असता M503 Geojit Financial Services Ltd या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड करुन घेण्यात आले. सदर ग्रुपमधील ग्रुप ॲडमिन Radhakrishnan Nair, Aishwary Shastri Geojit यांनी फिर्यादी यांना त्यांची M503 Geojit Financial Services Ltd ही कंपनी असुन त्या कंपनी मार्फत ब्लॉक ट्रेडींग आणि आयपीओ ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुक केली तर प्रत्येक दिवसाला १० ते १२ टक्के प्रॉफिट होईल असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना अमिष दाखवून ७६ लाख ११ हजार ७०० रुपयांची गुंतवणुक करायला सांगून कोणत्याही प्रकारे परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसात धाव घेतली.

फसवणुकीचा हा गुन्हा दखल झाल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. आरोपींनी या गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटपैकी २ बँक अकाऊंट हे नांदेड सिटी, पुणे येथील असल्याबाबत माहिती मिळाली. याठिकाणी पोलीस उपनिरिक्षक सागर पोमण व पथकाने जाऊन चौकशी केली असता सदरचे बँक अंकाउट हे आरोपी शुभम सोरटे याच्या सांगण्यावरून काढले असल्याची माहिती मिळाली. शुभम सोरटे याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता तो नांदेड सिटी परिसरातच असल्याची माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता त्याने अदित्य इंगळे (रा. जय भवानी नगर, म्हाडा रोड, भोकरदन, ता. भोकरदन जि. जालना) याच्यासोबत हा फसवणुकीचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आदित्य इंगळे याला देखील ताब्यात घेतले. आरोपी शुभम सोरटे व आदित्य इंगळे हे जालना आणि पुणे शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या इसमामार्फत बँक अंकाउट काढुन सदर अंकाउटची माहिती सायबर गुन्हेगारांना देवुन व त्यांच्याशी संगणमत करुन फसवणुक करत होते.
या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींनी वापरलेले बँक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांच्याकडे मिळुन आलेला मुद्देमाल, त्यांचा अशाप्रकारे किती गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याचा तपास चालु आहे. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे अधिकचा तपास करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरिक्षक प्रविण स्वामी, पोलॉस उपनिरिक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरिक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, अनिकेत टेमगीरे, विशाल निचित, भाविका प्रधान, दिपाली चव्हाण या पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने केली आहे.
नागरीकांना आवाहन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कृत ॲप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कृत ॲप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना? याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये असे आवाहन पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे यांनी केले आहे.

.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"