चांगल्या परताव्याचे अमिष; 1 कोटी 84 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे अमिष दाखवून एक कोटी 84 लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे .जून 2020 पासून काळेवाडी आणि विविध ठिकाणी ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी संतोष गोपीचंद बंदपट्टे (वय 43, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दिनेश आदिनाथ शेंडे (वय 40, रहाटणी) आणि एका 33 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचा विश्वास संपादन करून शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे अमिष दाखवले .त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 1 कोटी 84 लाख 41 हजार रुपये घेतले. मात्र मूळ रक्कम आणि त्यावरील परतावा न देता फसवणूक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी : आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला आळंदीतील पीसीएस चौकात अटक करण्यात आली. रविवार 27 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद शरीफ मोहम्मद जुबेर मन्सुरी (वय 22, रा. आळंदी, मूळ -बिहार) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून 50 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. घातक शस्त्र वापरण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचे आरोपीने उल्लंघन केले आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

