जीबीएस आजार नेमका आहे काय?

जाणून घेऊया आजाराची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. पुणे आणि त्यानंतर आज (शुक्रवार) पिंपरी-चिंचवडमध्ये या आजारामुळे पहिला बळी गेला आहे. पण हा आजार नेमका काय आहे आणि तो कशामुळे होतो तसेच याची लक्षणे काय आहेत हे प्रथम जाणून घेऊया. त्यामुळे आपल्याला बचावात्मक कृती करून आरोग्य सुरक्षित ठेवता येईल.
जीबीएस ही एक दुर्मिळ स्वयंप्रतिकारक स्थिती आहे. ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या परिघीय नसांवर हल्ला करते. यामुळे स्नायूंमध्ये बधिरपणा, मुंग्या येणे आणि स्नायू कमकुवत होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात जी अर्धांगवायूपर्यंत पोहोचू शकतात.
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक स्नायूंमध्ये बधिरपणा येतो आणि स्नायू कमकुवत होतात. या लक्षणांमध्ये हातपाय तीव्रतेने अशक्त झाल्यासारखे वाटते. अतिसार होते. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
काय काळजी घ्याल?
– पाणी उकळून व गाळून प्यावे.
– उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
– अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
– दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग होऊ शकतो.
– संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
– काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते.
– ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
– डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
– अतिसार
– पोटदुखी
– ताप
– मळमळ किंवा उलट्या