क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर विचार प्रबोधनपर्व उद्घाटन संपन्न!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्व २०२५ चे आयोजन ११ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भीमसृष्टी), पिंपरी येथे करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्धाटन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, कामगार नेते तुकाराम गायकवाड, गणेश भोसले, उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच सतिश वाघमारे व महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रबोधनपर्वाची सुरूवात मी जोतीबाची सावित्री या प्रज्ञा गवळी यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने झाली. या नाट्यप्रयोगात प्रज्ञा गवळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या उज्ज्वल कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा उहापोह आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला. त्यानंतर समता कला मंच प्रस्तुत शाहिरी जलसा हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सागर येल्लाळे, सुनिल गायकवाड, मारूती जकाते, वैशाली नगराळे, भारत लोणारे यांनी गीतगायनाचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
दुपारच्या सत्रात ख्यातनाम युवा कव्वाल सुरज आतिश यांचा समाज प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सुरज आतिश यांनी कव्वालीच्या सहाय्याने महापुरूषांच्या विचारांचा जागर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत गुलामांच्या उतरंडी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या माध्यमातून प्रभाकर पवार आणि सहकाऱ्यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातील प्रसंग प्रेक्षकांसमोर अभिनयाच्या माध्यमातून मांडले.
संध्याकाळच्या सत्रात जॉली मोरे आणि सिमा पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर नाट्य व भारतीय संविधानाची महती विशद करणारा वुई द पिपल हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात महापुरूषांच्या कार्याचा पारंपारिक नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून जागर करण्यात आला.
रात्रीच्या सत्रात ब्लू मून एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘क्रांतीसूर्य’ या नाटकाने प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित या नाटकात त्यांचा शिक्षणासाठी लढा, स्त्री-शिक्षणाची क्रांती, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष, तसेच जात-पात विरहित समाजरचनेचा ध्यास अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात आला. निर्माते राजपाल वंजारी आणि लेखक-दिग्दर्शक विजय गायकवाड यांनी नाटकात महात्मा फुल्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिगत संघर्ष, सावित्रीबाई फुले यांची साथ, आणि समाजजागृतीसाठीचे कार्य नाट्यमय रूपात सादर केले.
पिंपरी येथील एच.ए मैदान येथे संविधान शिल्पकार या भव्य महानाट्याचे आयोजन
१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित, प्रकाश आणि ध्वनीचा सुरेख संगम असणारे, संजय जीवने दिग्दर्शित आणि द बोधिसत्व फाऊंडेशन, नागपूर प्रस्तुत “संविधान शिल्पकार” या महानाट्याचे आयोजन पिंपरी येथील एच. ए मैदान येथे करण्यात आले आहे. या महानाटकामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा, गीत, नृत्य आणि ढोल-ताशा पथकावर रॅप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे, माता रमाई यांच्या भूमिकेत अनेक पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने यांच्यासह अनेक सिने आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे.
रांगोळीच्या माध्यमातून महापालिकेच्या दालनात उमटले सामाजिक क्रांतीचे रंग
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वा’चे औचित्य साधून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एक अनोखी आणि कलात्मक रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीमध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे देखणे चित्र साकारण्यात आले असून, त्यांचे विचार, योगदान आणि संघर्षाचे प्रतिबिंब या कलाकृतीतून दिसून येते. विविध रंगांच्या सहाय्याने साकारलेली ही रांगोळी सामाजिक संदेशाचे माध्यम ठरते आहे. या रांगोळीमुळे संपूर्ण प्रशासकीय इमारतीला एक प्रेरणादायी, संस्कृतिक आणि विचारमूल्यांनी भरलेले रूप प्राप्त झाले आहे. नागरिक, कर्मचारी यांच्याकडून या रांगोळीचे विशेष कौतुक होत आहे.