फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

सात जानेवारीपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव

सात जानेवारीपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव

ऑनलाइन चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी आवश्यक; सकस अन्न, समृद्ध निसर्ग संकल्पना

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या ७ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होणार आहे. पौष्टिक आणि सकस अन्न,समृद्ध निसर्ग तसेच आरोग्यपूर्ण समाज या संकल्पनेवर यंदाचा चित्रपट महोत्सव आधारित आहे. महोत्सवाचे हे १८ वे वर्ष आहे, अशी माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

भारताचे मिलेट मॅन म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. खादर वली यांना या महोत्सवामध्ये वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने रोज सकाळी ११ ते २ या वेळेत चित्रपटांचे प्रक्षेपण होणार आहे. त्याचे पुनःप्रक्षेपण सायंकाळी सात ते दहा या वेळेत होईल. पर्यावरण, हवामान बदल आणि ग्रामीण भारताच्या समस्यांबद्दल उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार निधी जामवाल यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पर्यावरणाशी संबंधित असलेले चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बेस्ट ऑफ सेंच्युरी एशिया हे ऑनलाइन छायाचित्र प्रदर्शन महोत्सवातील आकर्षण असेल. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, आनंद चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीव, ऊर्जा, हवा, पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम आणि चित्रपट यांना स्थान देणारा हा महोत्सव आहे, असे आरती किर्लोस्कर यांनी सांगितले. निसर्गाला जाणून घेण्याचा आणि पर्यावरणाशी संबंधित विविध प्रश्नांचा अभ्यास आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा हा वेगळा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/kirloskar-vasundhara-international-film-festival-kviff-2025-323431 या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"