शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खान याला धमक्या पाठविण्याचे सत्र सुरू असतानाच आता बॉलिवुडचा किंग खान शाहरूख याला सुद्धा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही धमकी सुद्धा बिश्नोई गँगकडूनच आली असल्याची कोणतीही खात्रीलायक माहिती हाती नाही. केवळ याबाबतची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खानला फोनवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पूर्वी अभिनेता सलमान खान याला सुद्धा असाच धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण जेलमधील लॉरेन्स बिश्नोईचे भाऊ असल्याचं सांगितलं होतं. आता शाहरूख खानला धमकी देण्यामागे नेमकं कोण आहे? किंवा हा कुणाचा चेष्टा करण्याचा प्रयत्न आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. शाहरूख खानला आलेल्या धमकीच्या फोनवरून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. राजपूर, छत्तीसगड येथून हा फोन आला असल्याचा अंदाज आहे. वांद्रे पोलिसांनी कलम ३०८ (४) आणि ३५१ (३) (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या धमकी प्रकरणी महंमद फैजन खान या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. पाच नोव्हेंबर रोजी या व्यक्तीच्या फोनवरून हा धमकीचा फोन बांद्रा पोलिस स्थानकात आला होता. मात्र, आपला फोन दोन नोव्हेंबर रोजी चोरीला गेला असल्याचे फैजन खान याने स्पष्टीकरण दिले आहे. खान हा व्यवसायाने वकील आहे. या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे.
बॉलिवुड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारीही बिश्नोई गँगने घेतली असून सलमान खानला त्यातून संदेश देण्याचा गँगचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. अशी पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, “धमकीचा फोन अज्ञात क्रमांकावरून करण्यात आला होता, असा अंदाज आहे. त्यामुळे कुणीतरी हा खोडसाळपणा केला असावा अशी शक्यता आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आलं आहे”.