चिंचवडला राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे, मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक तसेच विलो मॅथर अँड प्लॅटचे चेअरमन हेमंत वाटवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे ‘छंद खगोलशास्त्राचा’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सर्व खगोलप्रेमी नागरिकांसाठी खुले असणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.