फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये झुले व राईड्ससह मनोरंजनाची साधने लावण्यास बंदी!

महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये झुले व राईड्ससह मनोरंजनाची साधने लावण्यास बंदी!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला निर्णय – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये झुले, गोलचक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राईड्स अशा विविध प्रकारच्या मनोरंजनांची आणि खेळांची साधने लावण्यास परवानगी देऊ नये. तसेच या जागांवर अनाधिकृतपणे अशा प्रकारची खेळणी लावली जाणार नाहीत, याबाबत महापालिकेच्या सर्व संबंधित विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये नागरिक, संस्था यांच्यामार्फत विविध उत्सव, प्रदर्शने यासाठी महापालिकेच्या मोकळ्या/आरक्षित जागा, मैदाने, उद्याने इत्यादी भाड्याने घेण्यात येतात. या ठिकाणी नागरिक, लहान मुले जास्तीत जास्त संख्येने यावीत, यासाठी तेथे झुले, गोलचक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राईड्स अशा प्रकारचे विविध मनोरंजनांची व खेळांची साधने लावली जातात. सध्या अशा प्रकारे खेळांची साधने लावणे, लाईट लावणे, शोभेची लाईटिंग करणे याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील महापालिकेच्या मोकळ्या/आरक्षित जागा विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये काही ठिकाणी कार्यक्रमाबरोबर विविध यांत्रिक मनोरंजन खेळांची साधने लावली जातात. मात्र या साधनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून विविध समस्या निर्माण होत आहेत.

अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटून अपघात घडल्याचेही निदर्शनास आले आहे,अशा अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून अशा प्रकारे खेळांची साहित्य वापरावर निर्बंध घालणे आवश्यक असून महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये अशी खेळणी उभारण्यास परवानगी देऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या समस्या निर्माण होत आहेत
•झुले, गोलचक्रे, फुग्यांची घरे इत्यादी अनेक उपकरणे अपुरी देखभाल, निकृष्ट दर्जा किंवा अपात्र कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जातात. यामुळे लहान मुलांना दुखापतींचा मोठा धोका संभवतो.
•काही व्यक्ती मोकळ्या जागांमध्ये परवानगीशिवाय मनोरंजनाची उपकरणे उभारून तिकीट आकारणी करतात. यामुळे सार्वजनिक जागेचा अनधिकृत आणि व्यावसायिक वापर होतो.
•यांत्रिक मशीन्स/खेळणीची उभारणी करताना अपघात होऊ नये यासाठी योग्य डिझाईन (स्ट्रक्चर) करण्याबाबत काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
•खेळण्याच्या उपकरणांनी व्यापलेल्या जागेमुळे नागरिकांच्या चालण्याच्या, व्यायामाच्या, बसण्याच्या किंवा मैदानी खेळ खेळण्याच्या जागेवर मर्यादा येतात.
•काही ठिकाणी झुले किंवा खेळणी रस्त्यालगत उभारले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका वाढतो.
•योग्य स्वच्छतेची व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नसल्याने अशा उपकरणांचा वापर केल्याने लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
•फुग्यांची घरे, स्पीकर लावून चालवले जाणारे खेळ, कर्णकर्कश संगीत इत्यादींमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"