वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी जेरबंद!

गुन्हे शाखा युनिट एक पथकाची कारवाई
पिंपरी: बस थांब्यावर वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस गुन्हे शाखा युनिट एक पथकाने अवघ्या एक तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बस थांब्यांवर मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कट करून चोरी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने ज्या भागात चोऱ्या झाल्या. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून रेकी केली. बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे पडताळणी केली.
सोमवार 19 जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई चिखलकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे निगडी बस स्टॅन्ड मधुकर पवळे उड्डाण पुलाजवळ तीन महिला एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कटिंग करून फरार झाल्या आहेत अशी माहिती मिळताच संबंधित ठिकाणी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या वर्णनानुसार तीन महिलांना महिला पोलीस हवालदार दळे यांचे करवी ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता चोर महिलांच्या जवळ वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील कटिंग करून चोरी केलेले सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व गंठण असा मुद्देमाल मिळून आला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की या महिलांची आंतरराज्य टोळी असून त्यांच्यावर अफजलपुर, गुलबर्गा, विजयपुरा, कर्नाटक राज्य, तसेच बांद्रा, परभणी, दादर ,कुर्ला या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुळीक, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार जयवंत राऊत ,देवा राऊत, अजय इंगळे,सागर अवसरे, पोलीस हवलदार उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करसुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस शिपाई सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उद्धव खेडकर, दीपक तांदळे, केशव चेपटे यांनी कारवाईत भाग घेतला.

