पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग

चित्रपट प्रेमींना सर्व चित्रपट पूर्णपणे विनामूल्य पाहण्याची सुवर्णसंधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था, पुणे (एफटीआयआय) यांच्या सहकार्याने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या महोत्सवात भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, सायप्रस, इटली, ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, लेबनॉन, पॅलेस्टाईन, चिली, ब्राझील, जपान, थायलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस आदी देशांचा सहभाग आहे. विविध खंडांतील देशांमधून आलेल्या चित्रपटांमुळे महोत्सवाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांमधून विज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रेम व मानवी भावना, महापूर व आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे विविध विषय मांडण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण व लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृती संवर्धन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदल जनजागृती आणि कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा सकारात्मक व समाजाभिमुख विषयांचाही देखील समावेश आहे.
चित्रपट क्षेत्रात महिलांना अधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून विविध देशांतील आशयघन आणि दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून सांस्कृतिक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यंदा ४३ देशांतील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि दीर्घपट अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, तंत्रज्ञान, मानवी मूल्ये आणि जागतिक शांतता अशा विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

