शहर भाजप कार्यकारिणीमुळे अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शत्रुघन काटे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीमुळे अनेक पदाधिकारी नाराज असून माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी 24 तासातच आपला राजीनामा दिला आहे .याशिवाय शेतकरी विकास मोर्चाचे माजी अध्यक्ष संतोष तापकीर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून आत्मदहनाचा इशारा दिला आहे .नवीन कार्यकारणी मध्ये मूळ निष्ठावंतांना प्राधान्य दिले नसल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काटे यांनी 126 जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर केली .यामध्ये अनेक पदाधिकारी आपल्याला दिलेल्या पदाबाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात.. तुषार इंगे यांनी आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांना सरचिटणीस हे पद पाहिजे होते असे समजते .पक्षात काम करताना मानाचे पद असेल तरच मिरवता येते असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. इतर पदांना कोणीही महत्त्व देत नाही. पक्ष संघटनेचे काम हे मनापासून केले तरी त्या कामाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अशी कुचकामी पदे असण्यापेक्षा संघटनेत सभासद असणे पंसत करु असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मागील जिल्हा कार्यकारणी मध्ये ज्यांना कामाची पदे होती त्यांचा कार्यकारणी सदस्य म्हणून समावेश केला आहे .याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी या कार्यकारणी निवडीमुळे तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. संघटनेत अनेकांचे गट आहेत . कार्यकारिणीत ते आपले कार्यकर्ते अशा पध्दतीने बसवून सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात असा आरोप करत आहेत. ही मंडळी काम करतात का हे महत्त्वाचे आहे. शहराध्यक्ष काटे यांनी कार्यकारणी जाहीर करतानाच सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सर्वच कार्यकर्ते या निवडीमुळे समाधानी असतीलच असे नाही मात्र असमाधानी कार्यकर्त्यांचा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू असे त्यांनी जाहीर केले होते.