Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
कला साहित्य

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच : विश्वास पाटील

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच : विश्वास पाटील

पिंपरी : ‘साहित्य निर्मितीची प्रेरणा मला शाळेतूनच मिळाली!’ अशी कृतज्ञता ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, श्रीराम विद्या मंदिर, भोजापूर साहित्य कला संस्कृती मंडळ, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड या सर्व संस्थांच्या वतीने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांचा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. अतिशय भव्य सन्मानचिन्ह, शिवरायांच्या मावळ्याची पगडी असे सन्मानाचे स्वरूप होते.

viara vcc
viara vcc

याप्रसंगी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे, सुदाम भोरे, मुकुंद आवटे, डॉ. रोहिदास आल्हाट, श्रीराम विद्या मंदिरचे अध्यक्ष लालासाहेब जगदाळे, मुख्याध्यापिका संगीता हुंबे, सुनीता भोसले, पुरुषोत्तम सदाफुले मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले की, ‘मला साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांच्यामुळे मिळाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावलांजवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका! मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत!’ असे ठाम प्रतिपादनही पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. मिलिंद जोशी यांनी, ‘मोबाइलमध्ये रमलेल्या आजच्या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी दर्जेदार साहित्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय संमेलनातच मुलांच्या साहित्य कलागुणांना वाव मिळतो!’ असे विचार व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविकातून शाखेची साहित्यिक वाटचाल कथन करीत भोसरी शाखा विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान श्रीराम विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थी संघाच्या स्मरणिकेचे तसेच कवयित्री संजना मगर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. श्रीराम विद्या मंदिर येथील सर्व शिक्षकांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. शंकर गुळवे यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"